मुंबई नगरी टीम
पुणे : राज्यपाल पदाची एक गरिमा असते ती राखली गेली पाहिजे. राज्यपाल भाजपला झुकते माप देतात, अशी चर्चा करणारे ती गरिमा राखत नाहीत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. राज्यपाल भाजपला झुकते माप देतात अशी चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मिडियावर देखील केलेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशी चर्चा करणा-यांना चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच सुणावले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यपालांच्या कोट्यातील विधान परिषदेच्या जागांवर कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र राज्यपाल भाजपला झुकते माप देतात अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, राज्यपाल पदाची एक गरिमा असते ती राखली गेली पाहिजे. अशी चर्चा करणारे ती राखत नाहीत. मी राज्यपालांच्या पदाचा मान ठेवतो त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय हे सरकार अभ्यास करत नाही. कोणाचा सल्ला घेत नाही. हम करे सो कायदा, असे त्यांचे वागणे आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडायलाही तयार नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासह मराठा आरक्षण, विद्यार्थी फी या मुद्द्यांवर दोन्ही राजे बोलताना दिसत नाहीत असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, दोन्ही राजे खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे मी बोललो म्हणजे सर्व खासदार, आमदार बोलले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.