मुंबई नगरी टीम
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेवर राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत.या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केले.अर्णब यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा,अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी डोक्याला काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला.त्यानंतर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले. दरम्यान,अर्णबला पाठिंबा देणाऱ्या या आंदोलनात केवळ दोघेच सहभागी असल्याने सोशल मीडियावर राम कदम यांना ट्रोलही करण्यात आले.
याबाबत बोलताना राम कदम म्हणाले,लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवरील हा हल्ला आहे.महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.ज्याप्रकारे अर्णब गोस्वामीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.सरकारच्या या दडपशाहीविरोधात हे लाक्षणिक उपोषण आहे.अर्णबसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आपण येथे आंदोलन करत असल्याचे राम कदम यांनी सांगितले.तसेच अर्णब गोस्वामीसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा. अर्णब यांची तातडीने सुटका करा आणि सुधबुद्धीने केलेल्या त्यांच्या व त्यांचा कुटुंबियांवरील आरोप मागे घ्या,अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
यावेळी आ.कदम यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी बुधवारी अर्णब गोस्वामीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपने यावर टीका करत ठाकरे सरकारला लक्ष्य केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काल नागपुरात आंदोलन पुकारले होते. तर आज केवळ दोघांच्याच उपस्थितीत राम कदम यांनी आंदोलन केले. यावरून सोशल मीडियावर राम कदम यांनाच ट्रोल करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अन्वय नाईक यांना का नाही न्याय मिळाला ? असा सवाल राम कदम यांना नेटकऱ्यांनी यावेळी केला.