दहावी,बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार; मात्र परीक्षा मे पूर्वी घेणे अशक्य

मुंबई नगरी टीम

मुंबई : येत्या २३ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे,अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.मात्र असे असले तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नाही,असेही शिक्षणमंत्र्यांनी नमूद केले आहे.त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत हजेरी लावता येणार आहे.

दिवाळीनंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने याआधीच दिले होते. या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार सरकारचा आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये होतात. मात्र सद्यपरिस्थितीत पाहता नोव्हेंबरपासून वर्ग सुरू करण्याची विनंती मंत्रिमंडळाला केली आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या वर्गातील मुले मोठी असल्याने सोशल डिस्टनसिंग, मास्क लावणे हे नियम पाळले जातील. तर विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास दोन वेळेला बोलवण्यात येईल किंवा एक दिवसआड असेही करता येईल. अभ्यासक्रम देखील २५ टक्के कमी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांचे दडपण कमी करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

परीक्षांसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र मे महिन्यापूर्वी त्या घेणे शक्य नाही.जून, जुलै, ऑगस्ट हे पावसाचे महिने आहेत. सप्टेंबर महिन्यात निकाल येण्यास उशीर होईल. त्यामुळे मे महिन्यात परीक्षा घेण्याचा व शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. यावर मुख्यमंत्री आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleसरकारने पाठवलेल्या १२ नावांना राज्यपाल विरोध करणार नाहीत
Next articleअर्णब गोस्वामीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करणारे आ.राम कदम समाज माध्यमात ट्रोल