महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.तसेच सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय अनेक महानगरपालिकांनी घेतला असतनाच आता राज्यातील महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी जाहीर केले.वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कालच सामंत यांनी सर्व विभागीय आयुक्त,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक घेतली.कोरोनासंदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येवून विद्यार्थीं,पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षिततेबद्दल चर्चा करण्यात आल्यावर महाविद्यालयांबाबत आज निर्णय जाहीर करण्यात आला.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या.यामध्ये विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ व नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्किंग सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठे,महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इ. विद्यापीठानी त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावे.सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन ही वसतिगृह बंद करण्यात यावेत. यामध्ये परदेशी विद्यार्थी व संशोधन करीत असलेली पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतीगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरण कोविड केअर सेंटर म्हणून वसतिगृह आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.

विद्यापीठे तसेच महाविद्यालयानी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थी यादी स्थानिक प्राधिकरणांना देऊन लसीकरण साठी विशेष मोहीम राबवून तसेच विद्यार्थीया मध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतन मधील विद्यार्थी १५ ते १८ या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी व विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण करून घावेत. तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने ५० टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.महाविद्यालयांशी निगडीक वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन संबंधित वसतीगृहे देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. मात्र परदेशातून महाराष्ट्रात जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांची वसतीगृहाची सुविधा बंद करण्यात येऊ नये, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Previous articleराज्यातील महाविद्यालये बंद की सुरू राहणार ? उद्या होणार निर्णय
Next articleनिर्बंध कडक करा,पण लॉकडाऊन नको ! …भाजपची भूमिका