अन्यथा राज्यात पुन्हा मास्क सक्ती ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे.मुंबई पुणे शहरासह इतर ठिकाणी वाढणारी रुग्ण संख्या ही काळजी वाढवणारे आहे.जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्तीचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

गेल्या काही दिवसापासून मुंबई,पुणे शहरासह राज्यातील इतर भागात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.काल राज्यात १ हजार रूग्णांची भर पडल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.राज्यात वाढणा-या रूग्ण संख्येवरून राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी चिंता व्यक्त केली असून राज्यात अशीच रूग्ण संख्या वाढत राहिल्यास पुन्हा मास्क सक्तीचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.कोरोनाच्या तिन्ही लाटेत राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्यसरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहेत असेही पवार म्हणाले.यावेळी पवार यांनी केंद्राकडून येणा-या वस्तू व सेवा करावरही भाष्य केले. मार्च अखेरपर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी वस्तू व सेवा कराची रक्कम ही २९ हजार ६४७ कोटी रुपये होती. केंद्रसरकारने दोन दिवसांपुर्वी संपुर्ण देशातील २१ वेगवेगळ्या राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपये दिले. त्यापैकी १४ हजार १४५ कोटी एवढी रक्कम राज्यसरकारला मिळाली. अद्याप आपल्याकडे येणारी रक्कम १५ हजार ५०२ कोटी रुपये आहे. २०१९-२० पासून ज्यावेळी वस्तू व सेवा कायदा अस्तित्वात आला त्याला राज्यसरकारांनी ठराव करुन त्याला मान्यता दिली. २०१९-२० सालामधील महाराष्ट्राच्या वाट्याचे १ हजार २९ कोटी, २०२०-२१ मधील ६ हजार ४७० कोटी बाकी आहेत. २०२१-२२ मधील ८ हजार ३ कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम देखील लवकर मिळावी, यासाठी राज्यसरकारकडून प्रयत्न केले जातील.याचा फायदा अर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी आणि विविध विकासकामांसाठी होईल असे सांगतानाच पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर कमी करुन राज्यसरकारने साडे तीन हजार कोटी महसूल सोडून दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे पवार म्हणाले.

ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळायला हवे यावर आम्ही ठाम आहोत.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तो मानावाच लागतो परंतु मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसींना आरक्षण मिळायला हवे याप्रकारची काळजी राज्यसरकार घेत आहे असेही पवार म्हणाले.सध्या ओबीसींचा प्रश्न आहे.त्यांना प्रतिनिधीत्व मिळायला हवे.जातीनिहाय जनगणना ही चर्चा होते आहे. देशामध्ये नेमक्या किती जाती आहेत हे कळू द्या. म्हणजे जातींचा हा विषय थांबेल.राज्याची साडेबारा कोटी लोकसंख्या आहे. मात्र जातींबाबत जी ओरड लोकं करतात त्यांच्या आकडेवारीनुसार बेरीज केली तर ४० कोटींच्यावर जाते मात्र तेवढी संख्या नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली तर किती जाती आहेत हे स्पष्ट होईल असेही पवार म्हणाले.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे.यावर पवार यांची भाष्य केले.आजच महाराष्ट्रात नामांतर होते आहे का ? राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. औरंगाबादचे नामकरण असेल किंवा उस्मानाबाद यांच्याही नामांतराचा प्रश्न सुरु आहे.लोकशाहीत सर्वांना मागणी करण्याचा अधिकार आहे.या जशा मागण्या करणा-याला महत्त्वाच्या वाटतात.त्या सगळ्या वंदनीय, महनीय व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सध्या प्रश्न कुठले महत्त्वाचे आहे. हाही महत्त्वाचा आहे परंतु इतरही महत्त्वाचे त्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. मध्यंतरी बघितले की महंत चर्चेला बसले आणि एकमेकांना माईक उचलून मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रात्यक्षिक छगन भुजबळ दाखवले मी ते दाखवणार नाही.परंतु याच्यातून आपण काय मिळवणार आहोत आणि लोकांना काय संदेश देणार आहोत याचा विचार सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी करायला हवा असेही पवार म्हणाले.

कुणी काय आरोप करावा कुणी काय पत्र द्यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.नेहमीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे मान्यवर जात असतात अभिवादन करुन दर्शन घेत असतात. आजही नाही तर मागच्या काळात फडणवीस सरकारच्या काळात कार्यक्रम होत होते. आता शरद पवार जाऊन आले. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, रोहित पवार गेले याठिकाणी कुणीही जात- येत असतात त्यामुळे इथे राजकारणाचा संबंध येतो अशा शब्दात त्यांनी पडळकर यांना टोला लगावला.बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प पूर्णत्वास गेले पाहिजे असे वैयक्तिक मत व्यक्त करीत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेतील असेही पवार म्हणाले.

Previous articleराज्यसभा निवडणुकीत आमचाच उमेदवार जिंकणार; भाजप आणि महाविकास आघाडीचा दावा
Next articleकारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा : मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना खडसावले