राज्यसभा निवडणुकीत आमचाच उमेदवार जिंकणार; भाजप आणि महाविकास आघाडीचा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत असून,भाजपने सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने चुरस निर्माण झाली आहे.तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या बळावर आपलाच उमेदवार बाजी मारेल असा दावा भाजप आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या शुक्रवारी संपणार असल्याने भाजपचा उमेदवार माघार घेणार की,निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जूनला मतदान होणार आहे.शिवसेनेकडून संजय राऊत,संजय पवार यांनी तर भाजपकडून पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांनी अर्ज दाखल केले आहेत.भाजपने निवडणुकीच्या रिंगणात तिसरा उमेदवार उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.उमेदवारांना विजयासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे.सध्या भाजपचे १०६ आमदार असून,पक्षाला ५ अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.त्यामुळे भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी १५ मतांची आवश्यकता आहे.विधानसभेत शिवसेनेचे ५५ ( रमेश लटके यांचे निधन ) ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.विधानसभेत बहुजन विकास पक्ष ३, समाजवादी पार्टी २,एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मार्क्सवादी) १, शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य शक्ती पक्ष १.क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ असे छोट्या पक्षांचे १६ तर १३ अपक्ष आमदार आहेत.अपक्षांपैकी मंजूळा गावीत,चंद्रकांत पाटील,आशिष जैसवाल,नरेंद्र भोंडेकर,किशोर जोरगेवार,गीता जैन.संजय शिंदे आणि राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करण्याची शक्यता आहे. तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत, महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.मनसेचे एकमेव आमदार असून,मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटी मुदत आहे.तर शिवसेना आणि भाजप सहावी जागा लढविण्यावर ठाम आहेत.भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत.भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे. महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही. अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही असे सांगून महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले आहे.राज्यसभेची निवडणूक ही मते दाखवून मतदान केले जाते त्यामुळे घोडेबाजार होणार नाही.तर अपक्ष आमदार मतदान दाखवत नाही. त्यामुळे घोडेबाजाराची चर्चा सुरू आहे.सहाव्या जागेसाठी कमी पडणारी मते सेना आणि भाजपला लागणार आहेत. काही अपक्ष सेनेशी संलग्न आहेत तर काही राष्ट्रवादीकडे आहेत. आणि काही भाजपकडेही आहेत. त्यामुळे घोडेबाजारच्या अशा चर्चा सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.सध्या तुरूंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात जाणार आहे.त्यांना मतदान करण्याचा अधिकार असल्याने त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार असल्याचे सांगतानाच भाजपचे दोन,दोन्ही कॉग्रेसचे दोन आणि सेनेचा एक असे पाच सदस्य राज्यसभेवर निवडून येणारच आहे. आता सहावा उमेदवार सेनेने दिला आहे. आमची मतेही शिवसेनेलाच देणार आहोत असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleमध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही : छगन भुजबळ
Next articleअन्यथा राज्यात पुन्हा मास्क सक्ती ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा