स्वतःचा कचरा कसा करायचा यामध्ये शिवसेनेने पीएचडी केलीय

मुंबई नगरी टीम

मुंबई : आपली लायकी काय आहे हे शिवसेनेलाही माहिती नव्हते, पण आम्हाला माहिती होती. स्वतःचा कचरा कसा करायचा यामध्ये शिवसेनेने पीएचडी केली आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या खराब कामगिरीमुळे भाजप नेते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. निलेश राणे यांनीही शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावर अधिक बोलताना निलेश राणे म्हणाले, शिवसेनेने जे काही २३ उमेदवार उभे केले होते त्यांचे केवळ डिपॉझिटच नव्हे तर त्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली. २३ पैकी १८ ठिकाणी नोटापेक्षा कमी मतदान झाल्याचे कळाले. ही शिवसेनेची लायकी त्यांना माहिती नव्हती, पण आम्हाला माहिती होती. स्वतःचा कचरा कसा करायचा हे शिवसेनेला माहिती असून त्यांनी त्यात पीएचडी केली केली आहे, अशी टीका त्यांनी केली. गोव्यात देखील तसेच झाले. ज्या राज्यात शिवसेना निवडणुकीला उभी राहते तिथे आपटते. त्यामुळे शिवसेनेने इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्रात लक्ष द्यावे. लोकांची कामे करावीत, असा सल्लाही निलेश राणेंनी दिला.

यावेळी निलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र डागले. कोण आहे संजय राऊत? त्यांना आधी जनतेतून निवडून येण्यास सांगा, किमान नगरसेवक पदासाठी निवडून येण्यास सांगा. संजय राऊत कधी स्वतः निवडणुकीला उभे राहिले नाहीत. त्यांना कोणावर बोलण्याचा अधिकार काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निलेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातूनही शिवसेनेवर निशाणा साधला होता.

Previous articleवारकरी,कोळी बांधव,बॅण्ड पथकांचे राज ठाकरेंना साकडे; ठाकरेंनी दिला दिलासा
Next articleदिवाळीत बेसावध राहिलो तर.. ! मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा