मुंबई नगरी टीम
मुंबई : आमचे हिंदुत्व स्पष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असे म्हणत शिवसेना खासदर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी संजय राऊत शिवाजी पार्क येथे दाखल झाले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते व इतर पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती.
संजय राऊत यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत अनेकदा ताशेरे ओढले आहेत.हिंदुत्वावरून केल्या जाणाऱ्या या टिकेसंबंधी माध्यमांनी विचारले असता,आमचे हिंदुत्व स्पष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही,असे संजय राऊत यांनी म्हटले.आम्ही प्रखर हिंदुत्व होतो,आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही.आम्ही कधीच हिंदुत्वाचे राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तिथे शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील असेही ते म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी गतवर्षीच्या सरकार स्थापनेच्या आठवणींना देखील उजाळा दिला. गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. लोकांच्या मनात शंका होत्या. मात्र आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनाच मुख्यमंत्री तेही उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात आहेत ते कायम राहतील आणि प्रेरणा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही “असा मोहरा कधी न जाहला पुढे न होणार… बाळासाहेब ठाकरे नाव जगात गर्जत राहणार…”अशी मानवंदना दिली.