मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे ताळतंत्र सुटले आहे. पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अमावस्येचा फेरा आहे तो आणि डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे भाजपचे नेते भ्रमिष्ट झाले असल्याची बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते पातळी सोडून टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता तिखट प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांना देखील याबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले, “भाजपचे नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रातील नवे तर देशातील राजकारणातले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. आम्ही त्यांना सध्याच्या काळातले भीष्म पितामह म्हणतो. शरद पवारांवरील टीका ही लाजिरवाणी आहे. शरद पवार हे छोटे नेते आहेत असे भाजप नेते म्हणाले. मग, याच मोदी सरकारने शरद पवारांना देशातील दुसरा असा सर्वोच्च नागरी पद्मविभूषण हा पुरस्कार दिला. याचा अर्थ मोदी सरकारला कळत नाही? शरद पवारांचा सल्ला मी घेत असतो, हे गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. हे काय त्यांच्या राजकारणातील उंची कमी असल्यामुळे का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.
“शरद पवार यांच्या सारख्या नेत्यावर अशा प्रकराची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सत्ता मिळत नाही म्हणून तुम्हाला वैफल्य आले आहे. सत्ता येते सत्ता जाते. पण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोलले म्हणून कमी होत नाही”, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीला झालेल्या वर्षपूर्तीची आठवण करून देत भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. यासह त्यांनी राज्यातील, देशातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करतानाही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला. “देशात तसेच जगात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. पंतप्रधान मोदी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. कोरोनाचे संकट हे दुसऱ्या महायुद्धासारखे गंभीर असल्याचे मोदी सांगतात. पण हे गंभीर संकट महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कळत नसेल तर मला असे वाटते की, मोदींच्या नेतृत्वाची ही कमतरता आहे. अख्खा देशात मोदी काय सांगतात हे समजत आहे, पण महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांना ते कळत नाही हे दुर्दैव आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.