महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण ? प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात सध्या तापलेल्या वीज बिलांच्या मुद्द्यावरुन विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर थकीत बिलांच्या प्रश्नांवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे. मुख्यमंत्री नेमके कोण आहेत उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरू नये, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

यासंदर्भात अधिक बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरणने ५० टक्के ग्राहकांना विजेमध्ये सूट द्यायचा प्रस्ताव ऊर्जा खात्यात पाठवला होता. घरगुती स्वरूपाच्या वापर करणाऱ्यांना आपल्याला सवलत देता येते ही फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे का गेली नाही याचा खुलासा पहिल्यांदा ऊर्जा खात्याने करावा. की ती फाईलच त्यांच्याकडे आली नाही याचाही खुलासा त्यांनी करावा. ऊर्जा मंत्रालयातून ही फाईल सरळ अर्थ खात्यात म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाते. अजित पवार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला विचारात न घेता ही फाईल परस्पर नाकारतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मला हा विचारायचा आहे की खरा मुख्यमंत्री कोण?”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रिडींगसाठी दिलेल्या कंत्राटवर बंदी घालण्यात आली नव्हती. तर त्यावर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मीटर रिडींगमध्ये आमच्याकडून चूक झाली. ५० टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला असल्याचेही महावितरण सांगितले, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याशिवाय मार्च २०२० ला ५१ हजार ४६ कोटी थकबाकी होती. मात्र निम्म्याहून कमी थकबाकी ही २०१४ ला होती असेही ते म्हणाले.वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ, असे सांगून सरकारने त्यावरून आता घुमजाव केले आहे. ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये आलेल्या बिलांमध्ये वाढ करण्यात आली आहे ती कुणाच्या सांगण्यावरुन?, असा सवाल करत सरकारने त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीकेचा भडीमार केला जात आहे. सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपने सोमवारी वीज बिलांची होळी आंदोलन केले होते.

Previous articleपुढचे सरकार हे दिवसा येईल आणि ते शिवसेनेचे असेल,अनिल परबांची फडणवीसांना कोपरखळी
Next articleराष्ट्रवादीने कधीही फडणवीसांना टरबुज्या म्हटलेले नाही,भाजपच्या टीकेवर पाटलांचे स्पष्टीकरण