पुढचे सरकार हे दिवसा येईल आणि ते शिवसेनेचे असेल,अनिल परबांची फडणवीसांना कोपरखळी

मुंबई नगरी टीम

मुंबई : यापुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळीच शपथविधी तुम्हाला दिसेल, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. पाच वर्षानंतर जे सरकार येईल ते दिवसा येईल पहाटे कशाला येईल, आणि ते शिवसेनेचे असेल, असे उत्तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज वर्ष पूर्ण झाले असून त्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगलेली दिसत आहे.

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत बोलताना ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले होते. हे बेईमानीने आलेले सरकार आहे. त्यामुळे ते किती काळ चालेल याबद्दल मी कुठलेही भाष्य करणार नाही. मात्र, यापुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळीच शपथविधी तुम्हाला दिसेल, असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यावर विचारले असता अनिल परब म्हणाले, “पाच वर्षे त्यांना वाट बघायची आहे. पाच वर्षानंतर निवडणुका होतील. पुढे जे पण कुठले सरकार येईल ते दिवस ढळढळीत येईल ना पहाटे कशाला येईल. देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबर आहे की, पुढचे सरकार येईल ते अतिशय दिवसा येईल आणि ते शिवसेनेचे असेल”, ते म्हणाले.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांच्या प्रस्तावाला भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अद्याप मंजुरी न आल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली आहे का? यावर पुढील कार्यवाही काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला असता अनिल परब म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पत्राद्वारे १५ दिवसांत यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. हा कुठलाही कायदा किंवा नियम नाही की १५ दिवसांतच ते व्हायला पाहिजे. राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील, अशी मला पूर्ण खात्री आहे. १५ दिवसांत नाही तर पुढील काही दिवसांत ते निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे”, असे त्यांनी म्हटले.

Previous articleआता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल,फडणवीसांचे सूचक विधान
Next articleमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण ? प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा