मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकत शोध मोहीम सुरू केली आहे. यावरून आता भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांचे युद्ध जुंपल्याचे दिसत आहे. सरनाईक यांच्यावरील कारवाई ही महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे षडयंत्र असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळत आहे. यावर भाजप तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी न नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू.
आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही – संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देत आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, नोटिसा कसल्या पाठवता. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटले तरी आम्ही घाबरत नाही. ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो आदींची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे, असा धमकी वजा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
ही कारवाई म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ चा भाग? – छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपवर शरसंधान साधत आपल्यावरही अशीच सूडबुद्धीने कारवाई केली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या प्रकारणावेळी प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो बोलतो त्याला त्रास दिला जातो. त्यामुळे सरनाईक यांच्या कारवाईचा अंदाज होता, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असू शकते, असे मोठे विधान छगन भुजबळ यांनी केले असून त्यावर अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. दरम्यान, छगन भुजबळ भाजपविरोधात जास्त बोलले की छापेमारी आणि केसेस, शरद पवारसाहेबांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली तर नोटीस, अशी दडपशाही भाजपने केल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय एकाही भाजप नेत्याला ईडीची नोटीस का नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
चूक झाली असेल तर कारवाई होईल – देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, ईडीने धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी कारवाई करत नाही.ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक असेल तर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाजपचे सरकार असलेल्या राज्यात ईडीची कारवाई झाल्याचे सहा वर्षात दिसले नाही : बाळासाहेब थोरात
ईडीची कारवाई हे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी करत भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. काही केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. भाजपचे जिथे सरकार आहे त्या राज्यात छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर ईडी सारख्या संस्थाचा राजकारणासाठी वापर करणे हे दुर्दैवी असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
प्रताप सरनाईक साधू संत नाही – नारायण राणे
प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. मात्र त्यांनी यावर सविस्तर बोलण्यास नकार दिला आहे. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते, असे म्हणत त्यांनी या कारवाईवर बोलणे टाळले. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असे म्हणत याचे स्वागत केले आहे.