शिवसेना आमदाराचा ” लेटरबॅाम्ब”..मुख्यमंत्र्यांना म्हणाले ‘साहेब भाजपशी जुळवून घ्या’

मुंबई नगरी टीम

मुंबई । ईडीचा ससेमिरा मागे लागलेले ओवळा माजिवाडाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून,काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे.पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत.आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध,जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल,अशी विनंती सरनाईक यांनी या पत्रात केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र ९ जून २०२१ रोजी लिहिले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.९ जून २०२१ रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेले पत्र जसंच्या तसं……..

मा. श्री. उध्दवसाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
तथा शिवसेना पक्षप्रमुख.
महोदय,

आपण गेले दीड वर्षे राज्याची धुरा यशस्वी व समर्थपणे सांभाळत आहात. कोरोना सारख्या महासंकटाला आपण ज्या पद्धतीने तोंड दिले, या संकटाचा मुकाबला केला याबद्दल प्रत्येक जण आपल्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे. महाराष्ट्राची जनताच नाही तर देशात विदेशातही ‘महाराष्ट्र मॉडेल’ व आपल्या कार्यशैलीचे खूप कौतुक होत आहे. याचा आपले कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान आहे 80 करोना” ला रोखण्यासाठी राज्यात आपण ज्या प्रभावी उपाययोजना केल्या त्याची दखल देशात विदेशात घेतली गेली आहे. आपली अविरत मेहनत, दूरदृष्टी व एकूणच नियोजन यामुळे हे संकट कमी झाले. कोविडच्या पहिल्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर दुसरी लाट येणार हे अपेक्षीत धरून त्याआधीच आरोग्य सुविधा आपण वाढवल्या. मोठमोठी कोविड सेंटर उभारलीत. प्रयोगशाळा, ऑक्सिजन प्लांट व इतर आरोग्य सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र पुढे राहिला. कोरोनामुळे जनजीवन ठप्प व विस्कळीत झालेले असताना आपल्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आपण सुरु ठेवले. नुकतेच जे चक्रीवादळ आले त्या आपण सांत्वन केले व स्वतः जाऊन त्यांना मदत पोहोचवली, आधार दिला. हे करीत असताना मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोची कामे, उड्डाणपूल कोस्टल रोड व इतर सर्वच मोठ्या कामांसाठी आपण चांगले प्रयत्न करीत आहेत. दिवसरात्र आपण कामात झोकून दिले आहे. मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी “आरेची ८१२ एकर जमीन वनखात्याला मिळवून देत पर्यावरण रक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. अनेक मोठे निर्णय आपण घेतले आहेत. आपले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन साहेब !

मराठा व ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात जून रोजी आपण नवी दिल्लीत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतला त्याबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन. त्या बैठकीनंतर आपण मा. मोदीजी यांच्यासोबत अर्धा तास खासगीत चर्चा केल्याचे वृत्त दाखवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप तसेच सर्व पक्षीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दीड वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप महायुती म्हणून आपण एकत्र लढल्यानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरून आपली युती तुटली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची महाविकास आघाडी तयार झाली व राज्यात सत्ता स्थापन झाली. या अभूतपूर्व परिस्थितीत शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद मिळवत आपली ताकद, नेतृत्वगुण, कणखरपणा, राजकीय दूरदृष्टी आपण भाजपला व राज्याला देशाला दाखवून दिली. परंतु गेल्या दीड वर्षात कोरोना संकटाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहात. त्याचमुळे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री” म्हणून आपण पहिल्या क्रमांकावर आहात.

एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे.

साहेब, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुध्दा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे.पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध,जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे.ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.
धन्यवाद !

आपला स्नेहांकीत,
प्रताप सरनाईक

Previous articleराज्याच्या हितासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
Next articleप्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ अजून एका नेत्याने भाजपशी युती करण्याचे मुख्यमंत्र्यांना केले आवाहन