महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नसल्यानेच ईडीची कारवाई ; शरद पवारांचे टीकास्त्र

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली,असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रताप सरनाईक यांच्या कारवाईवरून विरोधकांवर टीकास्त्र डागले.लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरुद्ध सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे,असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज ईडीने केलेल्या कारवाईनंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार यांनीही यावर भाष्य करत भाजपला सुनावले.

बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.यावेळी ते बोलताना म्हणाले की, “लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी सरकारी संस्था राजकीय विरोधकांविरूद्ध वापरल्या जात आहेत. हे योग्य नाही. आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून त्यांना माहित आहे की ते येथे सत्तेवर येऊ शकत नाहीत.त्यामुळे ते केंद्रात असलेली शक्ती वापरत आहेत,अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली. यावेळी शरद पवारांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्ता स्थापनेवरून केलेल्या दाव्याचीही खिल्ली उडवली.रावसाहेब दानवे यांनी अनेक वर्षे विधीमंडळात काम केले.मात्र उद्याचे चित्र सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता. ते ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे सुद्धा माहीत नव्हते,अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली.तसेच सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्रास होत आहे.त्यामुळे त्यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे सारखे बोलावे लागते असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रसरकारकडून करण्यात येत आहे.शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचे आज पहायला मिळत आहे.राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आघाडीचे निर्णय महत्वाचे ठरत आहेत असेही पवार म्हणाले.रोगराईचे आज संकट आहे. संकट सुरुवात होण्याआधी प्रदेशाध्यक्ष यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले ते काम थांबले परंतु कोरोना संपल्यानंतर तेच काम जोमाने सुरू होईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.आम्ही शेवटच्या माणसासाठी काम करतोय हे चित्र लवकरच दिसेल. हे आमचं कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय. लोकांच्या भल्यासाठी सरकार काम करत आहे असेही पवार यांनी शेवटी सांगितले.

विकासाच्या प्रश्नासाठी इथून पुढे आपल्याला सहकार्य करु – अजित पवार

इथून पुढच्या काळात विकासाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आपल्याला सहकार्य करु असे आश्वासन देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत केले. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला आता जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षप्रवेश होत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केले तेच काम पुढे पवारसाहेब करत आहेत असेही पवार यांनी स्पष्ट केले.मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा फायदा होणार आहे हेही पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत – जयंत पाटील
भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून जयसिंगराव गायकवाड प्रवेश करत आहेत. त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. प्रत्येकाने ताकदीने पक्ष वाढवला आहे. जयसिंगराव गायकवाड भाजपात काम करत होते. मात्र भाजप जनतेच्या हिताची कामे करत नाही. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. सामान्य माणसाशी जिव्हाळा असणारा नेता आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रासारखी ताकद मराठवाड्यात निर्माण करु – धनंजय मुंडे

पश्चिम महाराष्ट्रात जशी ताकद राष्ट्रवादीची आहे त्याच ताकदीची राष्ट्रवादी मराठवाडयात जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशाने निर्माण होईल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.मला मनापासून आनंद आहे. काकांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात व मराठवाडयात हत्तीचं बळ मिळाले आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

भाजपात कामाची कदर नाही – जयसिंगराव गायकवाड

भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी बोलताना केला.जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असे प्रवेश करताना जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

Previous articleआगामी काळात मनसेला सोबत घेणार का ? फडणवीस म्हणतात…
Next articleस्वप्न पाहण्यातच यांची चार वर्षे निघून जातील; संजय राऊतांचा दानवेंना टोला