भाजपच्या १२० नेत्यांची यादी देणार,बघुयात ईडी कोणाला बोलावते : संजय राऊत

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेते आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण सत्ताधारी भाजपच्या १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकादा या सगळ्या चाैकशा पूर्ण होऊ देत. त्यानंतर नेत्यांची यादी पाठवतो. मग ईडी कोणाला बोलवते ते पाहूयात, असा इशारच संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच आपल्याला अद्याप ईडीची नोटीस आलेली नाही, आली तरी त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी म्हटले. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आमदार प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी केली जात आहे त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे, महाराष्ट्रात व्यापार करणे हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, तर महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. तुम्हाला देखील नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा असल्याचे विचारण्यात आले असता संजय राऊत म्हणाले की, मला अनेकांनी विचारले. मी त्याची वाट पाहत आहे. नोटीस आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणाला या काळात नोटीस आली तर धक्का बसणार नाही. कारण मला असे कळले आहे की, २० वर्ष जुनी थडगी उकारण्याचे काम चालू आहे. उत्खनन चालू आहे.ईडीवाले मोहन जोदडो हडप्पापर्यंत पोहचले आहेत. आम्ही पण तयार आहोत, असे ते म्हणाले.

जास्त बोलणे हे आजच्या काळात सर्वात मोठा गुन्हा असल्याचे विधान छगन भुजबळ यांनी केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सत्य बोलणे, पक्षाशी प्रामाणिक राहणे, ही सगळ्यात मोठी चूक सध्या मानली जात आहे. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही घाबरत नाही. देशात इतर काही काम नसेल. दहा हजार कोटींचे घोटाळे करुन काही जण देशातून पळून जात आहेत. काहींची संपत्ती एक कोटींवरुन पाच हजार कोटी होत आहे. पण ईडी त्यांची चौकशी करत नाही. मात्र महाराष्ट्रात जे प्रमुख नेते, त्यांच्या मुलांना दबावात आणून काही लोक राजकारण करू पाहत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Previous articleईडीची रेड पडली म्हणून माझं तोंड बंद होणार नाही ; प्रताप सरनाईक आक्रमक
Next articleआम्ही स्वप्न पाहत नाही तर थेट कृती करतो,चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार