आम्ही स्वप्न पाहत नाही तर थेट कृती करतो,चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार

मुंबई नगरी टीम

कराड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरून टोला हाणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही स्वप्न पाहत नाही तर थेट कृती करतो, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. तर १०५ आमदार असूनही सरकार बनवता आले नाही त्यांचे खरे दुखणे असल्याचे म्हणत, अजित पवारांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आज पुण्यतिथी निमित्त अजित पवार कराड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रकांतदादांना कुणी सांगितले आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडली ? आम्ही स्वप्ने पाहण्याचे काम करत नाही थेट कृती करतो, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली. भाजपचे नेते वारंवार महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे दावे करत असतात. यावर बोलताना, कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी, आमदारांमध्ये चलबिचल न होण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी सारखी गाजरे दाखवावी लागतात, असा सणसणीत टोला अजित पवारांनी लगावला. आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे.जोपर्यंत महाविकास आघाडीच्या पाठीमागे त्यांचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही.

ते १०५ असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही, ते त्यांचे खरे दुखणे आहे. त्यामुळे सारखे काही ना काही काड्या पेटवायचे काम त्यांचे सुरू आहे, अशी टीकाही अजित पवारांनी भाजप नेत्यांवर केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हे सरकार येत्या तीन महिन्यात पडेल त्यासाठी जुळवाजुळव सुरू असल्याचे सांगितले होते. या दाव्यावरूनच महाविकास आघाडीतील नेते भाजपला फटकारत आहेत.

Previous articleभाजपच्या १२० नेत्यांची यादी देणार,बघुयात ईडी कोणाला बोलावते : संजय राऊत
Next article‘या’ १२ जणांना आमदार करा; माजी राज्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस