मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश ईडीने प्रताप सरनाईक यांना दिला आहे. मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले आहे. दरम्यान, आपण क्वारंटाईन असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती प्रताप सरनाईक यांनी केली होती.
टॅाप्स सिक्युरिटी या समुहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांची मुले विहंग आणि पूर्वेश यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. प्रताप सरनाईक हे त्यावेळी मुंबई बाहेर होते. त्यामुळे ईडीने विहंग यांची पाच तास चाैकशी केली. तर बुधवारी प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावून चाैकशीसाठी बोलावले होते. मात्र आपण क्वारंटाईन असल्याने पुढील आठवड्यात चौकशी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांना आता क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.
या प्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. चांदोळे हे टॅाप्स समूहाचे भागीदारी आहेत. चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहूल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येईल, अशी ईडीला आशा आहे. राहूल नंदा हे टॅाप्स ग्रुपचे प्रमोटर आहेत. ईडीच्या कारवाईदरम्यान सरनाईक यांच्या परदेशी बँकेचे एक डेबिट कर्ड जप्त करण्यात आले असून यामार्फत झालेल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी सरनाईक यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.