मुख्यमंत्री ठाकरे यांची वक्तव्य राज्यासाठी चिंताजनक : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त यांची मुलाखत पूर्णपण भ्रमनिरास करणारी आहे. या वर्षभरात सरकारने नेमके काय केले याचा कुठेही उल्लेख नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल आमचे सरकार ५ वर्षे टिकणार मग तुमचा पुढील पाच वर्षाचा कृती आराखडा कुठे आहे.असा सवालही विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तिंने आम्ही बघून घेऊ अशी भाषा करणे योग्य नाही आम्ही सुध्दा दहा पटीने सुड घेऊ.तुम्हालाही लेकरे बाळं आहे असे वक्तव्य राज्यासाठी चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही असे वक्तव्य केले नाही. एक पक्ष प्रमुख म्हणून अश्या प्रकारची भाषा एक वेळ चालून जाईल परंतु मुख्यमंत्री म्हणून हे वक्तव्य अशोभनीय आहे. असेही दरेकर यांनी सांगितले. कारण महायुतीने जनाधार मागितला होता परंतु अनैसर्गिकरित्या का होईना त्या ठिकाणी त्या पदावर बसल्यानंतर राज्याच्या विकासाचं चिंतन,मंथन होण्याची आवश्यकता होती परंतु या ठिकाणी सूडाच्या भावनेनं वक्तव्य करणे चुकीचे आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने तसेच देशातील विविध राज्य सरकारने कोरोना संकटामध्ये शेतकऱ्यांसाठी पॅकेजस् जाहिर केलेले असताना महाविकास आघाडी सरकारने पॅकेज का जाहिर केले नाही असा सवाल उपस्थित करताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करु असे आश्वासन आपण दिलेले असताना चिंताग्रस्त होऊन १९७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण ? असा रोखठोक सवालही दरेकर यांनी केला आहे. मंत्री, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले तर तो आपल्याला महाराष्ट्राचा अपमान वाटतो, गतवर्षभरात राजरोसपणे कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब मराठी माणसाच्या आया बहीणींवर अत्याचाराच्या घटना घडल्या, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा अपमान झाला असे वाटत नाही का असे नमूद करताना ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये असलेला सृदूढ विरोधी पक्ष हा बळकट लोकशाहीचे लक्षण आहे, सरकारच्या चूका लक्षात आणून देणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे असे असताना विरोधी पक्षाने केलेली टिका तुम्हाला महाराष्ट्रद्रोही का वाटते ? त्याचेही उत्तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत मिळालेले नाही. राज्यात ७२ हजार सरकारी नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले असताना आपण गत वर्षभरात किती लोकांना नोकऱ्या दिल्या याचाही खुलासा आपल्या मुलाखतीतून झालेला नाही असेही दरेकर यांनी यावेळी निर्दशनास आणून दिले.

Previous articleमनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
Next articleत्यावेळी मोठ्या भावाची कुंडली माहित नव्हती का ? आमच्याकडेही त्यांची कुंडली आहे !