भाजपच्या विजयावर शरद पवार यांनी केले मोठे वक्तव्य..काय म्हणाले पवार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती.गुजरात निवडणुकीसाठी संपूर्ण देशाची सत्ता वापरण्यात आली.अनेक निर्णय एका राज्याच्या सोयीचे घेण्यात आले.अनेक प्रकल्प गुजरात मध्ये कसे येतील याची काळजी घेतली गेली.त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही.दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत ते जनतेने दाखवले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली.

गेली १५ वर्षे दिल्ली महानगरपालिकेत भाजपाची सत्ता होती ती आता राहिलेली नाही.भाजपची सत्ता असलेल्या हिमाचलप्रदेश मध्ये भाजपचा पराभव झाला.दिल्ली महानगपालिकेतील त्यांची सत्ता गेली. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागला आहे.राजकारणात पोकळी असते.गुजरातची पोकळी भाजपाने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवाल यांच्या आपने भरून काढली.आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद राजकीय जाणकार कार्यकर्त्यांनी घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजे. आज महाराष्ट्रात ती पोकळी आहे, त्या पोकळीला सामोरे जाऊन जनतेला पर्याय द्यायची ताकद कोणा पक्षात असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असेही शरद पवार म्हणाले.कमीत कमी भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध असलेल्या शक्ती आहेत त्या एकत्रित कशा करता येतील व त्या एकत्रित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या सर्व कामात प्रोत्साहित करता येईल, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पक्षाचे जिल्हा, तालुका, राज्याचे सर्व सहकारी कसे महत्वाची कामगिरी करतील हे बघण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

सीमाप्रश्न प्रश्न हा जुना असून,यात महाराष्ट्राची जी मागणी आहे तिला जनतेचा आधार आहे. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तरीही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशी परिस्थिती सध्या सीमाभागात झाली आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी बेळगाव किंवा अन्य भागातील प्रश्न संपुष्टात कसा निघेल, इथले मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले. अनेक सरकारी कार्यालय या ठिकाणी आणली, कानडी लोकसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला.मराठी आणि कानडी याच्यात वाद नाही.कानडीचा द्वेष आम्ही कधी करणार नाही.कानडीसुद्धा एका राज्याची भाषा आहे. आपल्या त्या राज्याशी संघर्ष नाही आपला संघर्ष फक्त तिथे असलेल्या मराठी भाषिकांना न्याय मिळावा,त्यांना न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे जो लोकशाहीच्या माध्यमातून अनेकदा सिद्ध झाला.तेवढ्यापूरता हा प्रश्न आहे पण दुर्दैवाने तिथल्या सरकारने वेगळी भूमिका घेतली. आज राज्याचे अधिवेशन त्या भागात घेता येईल यासाठी विधीमंडळ तिथे बांधले,येणारे अधिवेशन हे बंगळूरला न होता बेळगावला होणार आहे यातून त्या भागाचा महाराष्ट्राशी अथवा मराठी भाषिकांशी काही संबंध नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. शाळेत शिकण्याऱ्या विद्यार्थ्यांना मराठी न शिकता कानडी शिकावे हा आग्रह आहे त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत असेही पवार म्हणाले.

अलीकडे कोण गुजरातला जायचे आहे असे म्हणत आहे तर काही जण सोलापूरमधून आणखी कुठे जायचं म्हणत आहे असे चित्र यापूर्वी कधी नव्हते.मी सोलापूरचा अनेकवर्ष पालकमंत्री होतो. या जिल्ह्यात कानडी, तेलगू, उर्दू, मराठी असे अनेक भाषिक लोक आहेत. इतके वर्ष हे सर्व लोक गुण्यागोविंदाने तिथे राहत आले आहेत. मात्र आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर, अक्कलकोट अशा ठिकाणी आपला हक्क सांगतात याचा अर्थ काय ? असा सवालही पवार यांनी केला.कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की, कुठेही कटुता होणार नाही, सत्तेचा गैरवापर होणार नाही, वाहनांवर हल्ला होणार नाही ही चांगली गोष्ट आहे. परंतू शेवटी ते म्हणाले की, आमची मागणी आम्ही सोडणार नाही. यात पुन्हा ते सोलापूर, अक्कलकोट या गोष्टी आल्याच. जर संयमाने जाण्याची भूमिका व अन्य भाषिकांच्या हिताची जपणूक करण्याची निती ही त्यांची कायम असेल तर आपल्याकडून आगळीक कधी होऊ दिली जाणार नाही ही काळजी महाराष्ट्रातून आपण घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिले.

१७ डिसेंबरला होणारा मोर्चा हा सर्वपक्षीय आहे. तो सर्वपक्षीय मोर्चा प्रभावीपणे करणे व महाराष्ट्रच नव्हे तर देशाचा स्वाभिमान जो शिवछत्रपतींची प्रतिष्ठा यासाठी अवघा महाराष्ट्र एकत्र येतो याचे दर्शन या मोर्च्याच्या माध्यमातून दिसेल व पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टी, चुकीचा वापर राष्ट्रीय नेत्यांना एकप्रकारच्या बदनामीला मदत करणारी भूमिका या राज्यात घेतली जाणार नाही अशी अपेक्षा या मोर्चातून करू असेही पवार म्हणाले.राज्यपाल जे काही करतात यात अपेक्षा अशी आहे की केंद्रसरकारने काही निकाल घ्यावा.यात आपण समंजसपणे जावू. पण काहीही झाले तरी युगपुरूषाचा अपमान महाराष्ट्रातील कोणताही माणूस, कोणताही भाषिक असला तरी कदापि मान्य करणार नाही. संबंध महाराष्ट्र एकसंघ राहील याचे दर्शन उद्याच्या मोर्च्याच्या माध्यमातून आपण सगळे दाखवू असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Previous articleगुजरातमध्ये वारेमाप दारु, पैसा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर : नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Next articleदोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प,मुंबईकरांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य