मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी चांगलेच सुनावले. केंद्रीय तपास यंत्रणांचा संपूर्ण देशात गैरवापर होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केले. त्यामुळे अंगावर येणाऱ्यांना कसे उत्तर द्यायचे हे आपल्याला ठाऊक असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आव्हान दिले आहे.
नुकतीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केल्यानंतर भाजप विरुद्ध शिवसेना असे वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या आमदारांना त्रास दिला जात आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत मी शांत आणि संयमी आहे पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीने कुटुंबावरती किंवा मुला बाळांवरती येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना सांगू इच्छीतो की तुम्हालाही कुटुंब आणि मुले बाळे आहेत. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमची खिचडी कशी करायची आम्हाला ठाऊक आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आपण सीबीआयला वेसण घातली. दुरुपयोग करायला लागल्यावर अशी वेसण घालावीच लागते. ईडी , सीबीआयवर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावे, आमच्याकडे आहेत नावे. मालमसाला तयार आहे. पण सूडाने जायचे का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असे ते म्हणाले.
हिंदुत्व सोडायला ते काही धोतर नाही
यावेळी मुख्यमंत्र्यानी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसह राज्यपालांना जोरदार टोला हाणला. हिंदुत्व सोडायला ते काही धोतर नाही. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असे उत्तर त्यांनी दिले. मी शिवसेनाप्रमुखांचे आणि माझ्या आजोबांचे हिंदुत्व मानतो. देवळात घंटा बडवणारा नव्हे तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू त्यांना हवा होता. ते ९२-९३ साली त्यांनी करून दाखवले. पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची त्यांची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे झाले. त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेच्या भगव्यावरून सवाल करणाऱ्यांनी बिहारमध्ये काय फडकवले?
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने मिशन मुंबई सुरू केले आहे. शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही असे म्हणत आमचा भगवा तिथे फडकवू असा निर्धार भाजपने केला आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही याची व्याख्या तुम्ही कशी कराल?, तुम्ही बिहारमध्ये कोणता फडका फडकवलाय? मग तिथे का नाही भगवा फडकवत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंमत असेल तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवा, असे आव्हानही त्यांनी दिले. मुंबई महापालिकेवरील शिवसेनेचा भगवा उतरवण्याची तयारी भाजप करत आहे याविषयी बोलताना मुंबईकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी महापालिकेच्या गडाभोवती आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल त्यांनी या तटबंदीवर डोके आपटून बघावे. भगवा उतरवणे तर सोडून द्या, असे उद्धव ठाकरेंनी खडसावले.