स्वतःभोवती राजकारण फिरवत ठेवण्याचे पवारांचे कौशल्य मोठे : चंद्रकांत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपण शरद पवारांचा आदर करतो, असे म्हणत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले होते. तर आता पुन्हा त्यांनी शरद पवारांविषयी भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी इतर विषयांवर देखील आपले मत मांडले आहे.

मी स्वतः शरद पवारांवर अतिशय मनापासून पीएचडी करत आहे. इतकी वर्षे राजकारणात राहत असताना प्रामुख्याने महाराष्ट्राचे राजकारण स्वतःभोवती फिरवत ठेवणे हे कौशल्य त्यांना कसे जमले यावर मी पीएचडी करत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पवारांची उंची तसेच त्यांचा अभ्यास कमी आहे, अशी टीका का करावीशी वाटली, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत चंद्रकांत पाटील म्हणाले की, पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्गार काढले आहेत. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्या एवढा अभ्यास कुणाचा नाही. मराठा आरक्षाबाबत भाष्य करताना शरद पवारांवर ते वक्तव्य केले होते. मात्र ते व्यक्तिगत त्यांच्याबद्दल नव्हते, सर्व नेत्यांबद्दल ते होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभ्यासाविषयी काय वाटते यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांच्याबद्दल आकस नाही. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते, त्यातही अनेक प्रकार आहेत. उद्धवजींना या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यांनी आपला अभ्यास वाढवायला हवा, असा सल्लाही पाटलांनी दिला.

केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी तुमच्याही घरी मुलं बाळं आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा भाजपला दिला. यावर आमच्या कुणाच्या चौकशा लावायच्या असतील तर खुशाल लावू शकतात, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. यांना घटना मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसतो. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चांगला. मात्र अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत निर्णय दिला तर तो चुकीचा, अशी टीका त्यांनी केली. कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामींच्या वेळी अॅक्शन घेताना तुम्ही आम्हाला विचारले होते का? तुमच्याकडे सरकार आहे, पॉवर आहे. त्यामुळे आमच्या चौकशा लावण्यासाठी तुम्हाला कोणी अडवले, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी खुले आमंत्रणच दिले आहे.

Previous articleआडवे करण्याची शिवसेनेची भाषा पहिल्यापासूनच : छगन भुजबळ
Next articleअंगावर येणाऱ्यांनो “तुमची खिचडी” कशी करायची आम्हाला ठाऊक