मुंबई नगरी टीम
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. यावरून महविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत केंद्रीय तपास यंत्रणेसह भाजपलाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सध्या संजय राऊतांचे हे ट्वीट समाज माध्यमावर चर्चेत आले आहे.
संजय राऊत एक ट्वीट केलेल्या व्यंगचित्रात दोन कुत्रे उभे आहेत. त्यातील एका कुत्र्यावर सीबीआय तर दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहले आहे. हे दोघेही महाराष्ट्राच्या दिशेने उभे आहेत. “थांब कोणाच्या घरी जायचे हे अजून ठरले नाही”, असा आशय देखील या ट्वीटमध्ये लिहला आहे. संजय राऊत यांच्या या ट्वीटमधून भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला आहे. तर तासाभरातच या ट्वीटला अनेक लाईक्स देखील मिळाल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांत महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत विविध प्रकरणामुळे सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांच्या कारवाईचा वेग वाढताना दिसत आहे. या मार्फत विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
याचे ताजे उदाहरण म्हणजेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीच्या पथकाने मंगळवारी छापेमारी करत कारवाई केली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांनाही ताब्यात घेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या कारवाईचे भाजप नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतरासाठी भाजप ईडीचा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. सीबीआय आणि ईडी हे केंद्र सरकाराच्या हातातील बाहुले झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावर भाष्य करत भाजपला सुनावले होते.