…तरीही खडसे आणि जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत आले : अजित पवार

मुंबई नगरी टीम

नांदेड : भाजपमधील कार्यकर्ते कुठेही जाऊ नयेत म्हणून सरकार पडेल असे गाजर दाखवले जात आहे.तरी देखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड हे आमच्याकडे आले,अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना मारली.मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे शुक्रवारी नांदेडमध्ये आले होते.यावेळी त्यांनी भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, अशी टीकाही केली.

भाजपचे नेते कोणाबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची बोचरी टीका अजित पवारांनी केली. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. तर अजित पवारांनी देखील महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याचे म्हणत निशाणा साधला.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे भाकीत भाजपचे नेते करताना दिसतात. मात्र दुसरीकडे भाजमध्येच गळती लागल्याचे चित्र आहे. एकनाथ खडसे यांनी एक महिन्यापूर्वीच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश केला.तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे सरकार पडण्याचे दावे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना अजित पवारांनी एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांचे उदाहरण देत गप्प केले आहे.

Previous articleसरकार पडले तर बघू काय करायचे ते, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Next articleसीबीआय,ईडीची तुलना कुत्र्यांशी,संजय राऊतांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत