मुंबई नगरी टीम
मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.अन्वय नाईक प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयात मिटिंग घेण्यात आली होती, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. अनिल देशमुख यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यावर अधिक बोलताना अनिल देशमुख म्हणाले, अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहली होती. त्यात अर्णब गोस्वामीने पैसे न दिल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर तत्कालीन सरकारने हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयात मिटिंग घेतली होती. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आले, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.तसेच अर्णब गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आल्याचा आरोप नाईक कुटुंबाने देखील केला असून त्यांनीच आम्हाला हे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार या प्रकरणी आम्ही कारवाई सुरू केली असल्याची माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.
यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कारवाईविषयी भाष्य करत केंद्रावर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून ईडी व इतर यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक यांचे प्रकरण लावून धरले होते. विधानसभेतही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. केंद्रालाही त्यांनी जाब विचारला. त्यामुळे राजकीय सुडापोटी सरनाईक यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार सुडाने काम करते असा विरोधकांचा आरोप आहे. मात्र आम्ही कोणावरही सुडाने कारवाई केली नाही. तथ्याच्या आधारे आम्ही निर्णय घेतो, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.