मुंबई नगरी टीम
अहमदनगर : दोन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल व भाजप पुन्हा सत्तेत येईल हा भाजप नेत्यांचा दावा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत अशा खोचक शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. अहमदनगर येथून आष्टीकडे दौऱ्यावर जात असताना अहमदनगर येथे काही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना धनंजय मुंडे उत्तर देत होते.
राज्य सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले असून या कालावधी मध्ये कोविड १९ च्या जागतिक महामारीचा सामना राज्य सरकारच्या सर्वच प्रतिनिधींनी मोठ्या धैर्याने व संयमाने केला आहे. या संकट काळातही राज्य सरकारने अर्थचक्र थांबू नये यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचे मुंडे एक प्रश्नावर बोलताना म्हणाले.सत्तेत येताच ऐतिहासिक कर्जमाफी करणे, इंदूमिलच्या स्मारकाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम वेगाने और करणे अशा अनेक उपलब्धी या काळात सरकारने प्राप्त केल्या असून, विरोधकांनी मात्र केवळ विरोधाला विरोध करण्याची भूमिका पार पाडली आहे असेही मुंडे म्हणाले.राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण असताना, मदत केंद्राला आणि प्रश्न राज्य सरकारला अशी दुटप्पी भूमिका घेणारे विरोधी पक्षाचे नेते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे का मागत नाहीत असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
आपल्या पक्षातील लोक इकडे तिकडे फुटून जाऊ नयेत म्हणून दर आठवड्याला भाजप मधील एक नेता महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशा पुड्या सोडत असतात, मुळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीनही प्रमुख पक्ष व इतर घटक पक्ष एकरूप असून आमची ही आघाडी तोडणे म्हणजे निव्वळ ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’च म्हणावे लागतील अशी मिश्किल टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने आपण एक मार्गदर्शक, संघर्षशील, सर्वगुणसंपन्न नेतृत्व गमावले असून सबंध राष्ट्रवादी काँग्रेस परिवार भालके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.