सत्तेसाठी शिवसेनेची मूळ विचाराला तिलांजली : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे विधान हे शिवसेनेचे सत्तेनंतरचे बदलते स्वरूप स्पष्ट करणारे विधान आहे. यात कहर म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा दाखला त्यात देण्यात आला आहे.त्यामुळे शिवसेनेने सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ आचार विचाराला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, हे याचेच द्योतक आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अजान पठण स्पर्धेच्या घोषणेवर दरेकर यांनी टिका केली आहे.

अजानमुळे मन:शांती मिळते. त्यामुळे अजानची गोडी लहान मुलांना लागवी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे पांडुरंग सपकाळ यांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे महाआरती होते तशीच अजान अदा केली जाते. अजानला विरोध करण्याचा प्रश्नच नाही असंही सकपाळ यांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेनेचं स्वरुप बदलत आहे. शिवसेनाप्रमुख प्रत्येक धर्म प्यारा असे बोलले असतील, परंतु त्यांची पालखी उचला असं ते कधी बोलले नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी त्यांच्या आचार विचारावर टीका केली.पण सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. तसेच मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला तसेच नेतृत्वाला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केली आहे हे याचेच द्योतक आहे, असेही दरेकर यांनी नमुद केले आहे.

Previous articleउद्योजक व बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करण्याचे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे षडयंत्र
Next articleशेतकरी काय अतिरेकी आहेत का ? मोदी सरकारवर राऊत कडाडले