पदवीधर निवडणूक निकालानंतर सत्ता बदलाच्या प्रक्रियेला सुरूवात : भाजप खासदाराचा दावा

मुंबई नगरी टीम

पुणे : राज्यातील भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार पडणार असे दावे वारंवार केले जातात. असाच आणखी एक दावा भाजपचे पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्व आणि राज्य सरकार बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

विधानपरिषदेच्या जागेसाठी राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले आहे. गिरीश बापट यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ता बदलाविषयी भाष्य केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात रस नाही. हे सरकार त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्याच वजनामुळे पडेल, असे गिरीश बापट यांनी म्हटले.

यासह कोरोनाची महासाथ हाताळण्यात देखील हे सरकार अपयशी ठरले. महापूर, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारच्या विरोधातील नाराजीचा फायदा भाजप मित्र पक्षाला होणार असून आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीच्या निकालामधून महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्व आणि राज्य सरकार बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या दोन-तीन महिन्यात हे सरकार पडेल, त्यासाठी जुळवाजुळव सुरू झाले असल्याचे म्हटले होते.

Previous articleअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
Next articleमाझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला केला : आदित्य ठाकरे