शिवसेना कधी फरफटत जाणाऱ्या पक्षासारखी नव्हती : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.या सरकारमध्ये कुठे उगाच अडेलतटूपणा नाही,सर्वांची मानमर्यादा धरून काम पाहिले जात आहे. उगाच विषय लावून धरले जात नाही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे.त्यानिमित्ताने आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते “महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी करीत,मैदानातून येऊन टोलेबाजी करण्याचा वेगळा अनुभव आहे. गेल्या वर्षभरामध्ये आमचे टीमवर्क झाले आहे. शरद पवार यांचे आशिर्वाद आमच्यावर आहे.अजूनही विश्वास बसत नाही की सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे.प्रत्यक्ष क्रिकेट पाहणे आणि मैदानात उतरून टोलेबाजी करणे हे वेगळे असते. त्यासाठी टीम ही मजबूत असायला लागते. माझी टीम ही उत्तम आहे.सर्व जण अनुभवी आहे. सर्व जण चांगले काम करत आहे’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकार्यांचे कौतुक केले.या सरकारमध्ये कुठे उगाच अडेलतटूपणा नाही, सर्वांची मानमर्यादा धरून काम पाहिले जात आहे. विषय उगाच लावून धरले जात नाही.या सरकारला तीन चाकी सरकार म्हणतात. पण चौथे चाक म्हणजे लोकांचा विश्वास आहे, आमचे पाय जमिनीवर घट्ट आहे, असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

हे सरकार होवूच शकणार नाही असे अनेक जणांना वाटत होते.या सरकारला शरद पवार,सोनिया गांधी या सर्वांचे आशिर्वाद आहेत.शरद पवार हे कधीच एका जागी थांबत नाही. हुतेक लॉकडाउन लागला तेव्हा ते कदाचित घरी थांबले असतील असे सांगून शरद पवार यांच्या आयुष्यावर एखादे पुस्तक तयार करायला हवे, जे येणाऱ्या नवोदित राजकारण्यांना मार्गदर्शक ठरेल’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.सोनिया गांधी यांच्याशी एकदाच भेट झाली असे सांगून, बऱ्याच वेळा त्यांच्याशी फोनवर बोलणे होत असते.फोनवर बोलताना त्या नेहमी विचारता असतात की,सरकारचे चांगले काम सुरू आहे,आमची लोकं त्रास तर देत नाही ना ? असे विचारत असतात.पण मी तुमची बाजू लावून धरत असतो,राष्ट्रवादीपेक्षा जास्त तुम्ही सहकार्य करता’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच एकच हश्शा पिकला.

Previous articleबीएचआर घोटाळा प्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजनांनी साधला खडसेंवर निशाणा
Next articleपुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल : शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास