मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्याने समोर येताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच एका मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी मत व्यक्त केले होते. त्यावरून काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ट्वीट करत त्यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता महविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातींल अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
“आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती, लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे”, असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. यशोमती यांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या या नाराजीनंतर महाविकास आघाडीत नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शरद पवार यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यावेळी ते म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला पक्षात आणि लोकांमध्ये किती मान्यता आहे हे पाहणे फार आवश्यक असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू घराण्याबद्दल प्रचंड आस्था आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव आहे, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात काँग्रेस नेतृत्वाविषयी पुन्हा चर्चा रंगल्या होत्या. तर आता थेट काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांचे एकत्रित बनलेले सरकार आहे, असे लक्षात आणून देत सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.