शरद पवारांचे सांगणे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवे, शिवसेनेचा काँग्रेसला राजकीय सल्ला

मुंबई नगरी टीम

मुंबई : शरद पवार यांचे सांगणे, हे त्यांच्यापेक्षा अनुभवाने कमी असलेल्या कुणीही केवळ राहूल गांधीच नव्हे, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवे. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी व्यक्त केलेल्या मतावरून काँग्रेसने नाराजीचा सूर आवळला आहे. हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असा इशाराच काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला राजकीय सल्ला दिला आहे.

यावर अधिक बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांच्याबाबतीत अशी विधाने वारंवार होत असतात. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाचा मी सगळ्यात मोठा समर्थक आहे. सगळ्यांनाच पंडित नेहरू होता येत नाही. तसेच नरेंद्र मोदी किंवा शरद पवार सगळ्यांना होता येणार नाही. प्रत्येकाच्या नेतृत्वाच्या आपल्या काही मर्यादा असतात, मोदींच्याही आहेत. अशावेळी ज्या सातत्याविषयी शरद पवार बोलत आहेत, त्यांचे जे सांगणे आहे, हे त्यांच्यापेक्षा अनुभवाने कमी असलेल्या कुणीही केवळ राहुल गांधीच नव्हे तर, इतरांनीही ते मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवे. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आम्ही आणि शिवसेनेचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात. शरद पावारांचा दांडगा अनुभव असेल, तर सगळ्यांनी आपला अहंकार आणि इगो विसरावा. आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे. त्यांच्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावेत यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Previous articleठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांनेच दिला सरकारला “हा” इशारा
Next articleईडी,सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही