ईडी,सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही

मुंबई नगरी टीम

नाशिक : राज्यातील विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने आपल्या विजयाचा झेंडा रोवला असून भाजपला पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला चिमटे काढले आहेत. निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे भुजबळ म्हणाले. शनिवारी ते लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर ते निवडून आले. परंतु मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, हे देखील त्यांनी अधोरेखित केले. तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढल्यानेच हे यश मिळाले असून मते विभागली गेली नाहीत. अगदी पुणे आणि नागपूर या मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या बाजूने कौल मिळाला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा आणि जमिनीवर उतरून काम करायला हवे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.

यावेळी छगन भुजबळ यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर देखील प्रतिक्रिया दिली. यशोमती ठाकूर काय बोलल्या ते मी वाचले नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी एकत्रित काम करतात. तेव्हा कोणी काही विचारले तर बोलावे लागेल. याचा अर्थ टोचून बोलणे होत नाही. तसेच मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला होता. याचा अर्थ मी शिवसेनेवर टीका करतो असे नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Previous articleशरद पवारांचे सांगणे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवे, शिवसेनेचा काँग्रेसला राजकीय सल्ला
Next articleमराठा आरक्षण: ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी ५ वकिलांची समन्वय समिती