मुंबई नगरी टीम
पुणे : शिक्षक-पदवीधर मतदारसांघाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी भाजपला पराभवाची धूळ चारली. पराभवाच्या या धक्क्यातून सावरत नाही तेच आता भाजपला आणखी एक झटका मिळण्याची शक्यता आहे. भाजपचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे,जयसिंगराव गायकवाडनंतर हा तिसरा धक्का भाजपला बसणार का? असे तर्क-वितर्क काढले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जानकर यांनी ३ डिसेंबरला विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याने जानकारांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राजकीय मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाली, अशी माहिती आहे. पंरतु अद्यापही या भेटीचे नेमके कारण गुलदस्त्यातच आहे. महत्त्वाचे म्हणजे जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. जानकरांच्या या भेटीगाठीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने महादेव जानकर यांच्या माध्यमातून शरद पवारांना तगडे आव्हान दिले होते. त्यामुळे जानकर आणि शरद पवार यांच्यात अचानक झालेल्या या भेटीमुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. दोन महिन्यांपूर्वीच उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ बीडचे भाजपचे खासदार आणि राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनीही पक्षावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे जानकर यांच्या भेटीमुळे नेमके काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.