जिथे शेतकरी दुःखी तो देश कधीच प्रगती करत नाही : उर्मिला मातोंडकरांचा केंद्रावर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मंगळवारी शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक पुकारली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. ज्या देशातील शेतकरी दुःखी आहे तो देश कधीच प्रगती करत नाही. शेतकऱ्यांबाबत हे सरकार असंवेदनशील आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी भूमिका मांडली. “शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याहून दुर्दैवी म्हणजे सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक ही निष्ठूर आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कुठल्याही देशातील शेतकरी जर दुःखी आहे, तर तिथला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. तिथे नेहमीच समस्या राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे हे ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे”, असे मत उर्मिला यांनी मांडले. “सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे. तसेच प्रसारमाध्यमांतून देखील अनेक वेगवगेळ्या बातम्या समोर येतात. ते नक्की शेतकरी आहेत का? त्यांचे कपडे, त्यांच्या वस्तू ते इंग्रजी कसे बोलतात?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शेतकरी आपले घरदार सोडून अबालवृद्धांसह रस्त्यावर उतरले आहेत. थंडीत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात येतात. त्यामुळे सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे”, असे त्या म्हणाल्या. गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत, ते रद्द करावेत, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या बैठकीतही काहीच तोडगा न निघाल्याने भारत बंदची हाक पुकारण्यात आली. देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी याला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही या आंदोलना पाठिंबा दिला आहे. तर भाजपने आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Previous article१० वर्षांपूर्वीचे बोलू नका आजचे बोला, शेतकरी आज रस्त्यावर आहे त्यावर बोला
Next articleमहादेव जानकरांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट; दीड तास केली चर्चा