काँग्रेसचा एल्गार ! उद्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस करणार तीव्र आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई । लोकशाही मुल्ये व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरु असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे.केंद्र सरकारच्या या जुलूमी,अत्याचारी व हुकूमशाहीविरोधात काँग्रेसच्यावतीने आज मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपाय यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत.याच प्रकरणात याआधी राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास चौकशी करण्यात आली. आता सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. वास्तविक पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाला नाहक त्रास देणे व त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे. परंतु काँग्रेस पक्ष भाजपा व मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नसून आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देऊ.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस केंद्र सरकारच्या मनमानीविरोधात राज्यभर आंदोलन करून ईडीच्या कारवाईचा निषेध करणार आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे, यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.तसेच राज्यात जेथे जेथे ईडी कार्यालये आहेत त्या कार्यालयासमोर तसेच जिल्हा विभागीय कार्यालयासमोरही आंदोलन केले जाणार आहे.नागपूर विभागात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, खा. सुरेश धानोरकर, अमरावती विभागात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, यशोमती ठाकूर, प्रा. वसंत पुरके, मराठवाडा विभागात प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख, उत्तर महाराष्ट्र विभागात माजी मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के. सी. पाडवी, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील तर पश्चिम महाराष्ट्र विभागात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम व प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हाध्यक्ष, आजी, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी, सर्व आघाडी संघटना व सेल यांचे प्रमुख व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे पटोले म्हणाले.

Previous articleओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजप आणि महाविकास आघाडीत श्रेयवादाची लढाई
Next articleपुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात : माजी मंत्र्याचे सूचक वक्तव्य