१० वर्षांपूर्वीचे बोलू नका आजचे बोला, शेतकरी आज रस्त्यावर आहे त्यावर बोला

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली होती. जर उत्खनन करण्याचे ठरवले तर खूप लांब जात येईल. १० वर्षांपूर्वीचे बोलू नका, शेतकरी आज रस्त्यावर आहे त्यावर बोला,असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना दिले आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुन्हा भूमिका मांडली.

शेतकरी रस्त्यावर उतरला असून त्याला कोणतेही राजकीय पाठबळ नाही, हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. शेतकरी आज स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलण्यास तयार झाला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने याचा विचार केला, तर देवेंद्र फडणवीस देखील शेतक-यांच्या बाजूने उभे राहतील याची मला खात्री आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

केंद्र सरकार जर मनापासून काम करत असेल तर कोणत्याही दबावाची गरज नाही. सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांचे ऐकले तर संपूर्ण जग आपले ऐकेल, असेही राऊत म्हणाले. तसेच लोकसभेत जेव्हा कृषी विधेयक सादर करण्यात आले होते. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यासंदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याविषयी संजय राऊत यांनी भाष्य केले. शरद पवार राष्ट्रपतींना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतील. राष्ट्रपतींना अधिकार असतील तर ते प्रश्न सोडवतील. शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन कोणाला भेटायची गरज नाही. शरद पवार भेटत आहेत, ते महाराष्ट्राचीच भूमिका मांडतील’ असे ते म्हणाले.

Previous articleआरोग्य विभागातील ८ हजार ५०० जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांची मंजूरी
Next articleजिथे शेतकरी दुःखी तो देश कधीच प्रगती करत नाही : उर्मिला मातोंडकरांचा केंद्रावर निशाणा