आमदार सैरभैर होवू नये म्हणून संजय राऊतांचे राजकारण ; मंत्री उदय सामंतांचा राऊतांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात कोसळणार असल्याचे भाकित शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.त्यांच्या या भाकिताचा समाचार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.शिंदे सरकार पडणार असल्याचे भाकित करणे हे अंधश्रद्धा नाही का ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे गटाकडे असलेले आमदार सैरभैर होवू नये म्हणून संजय राऊतांकडून राडकारण सुरू असल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौ-यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथे भविष्य पाहिले.त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधत राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार हे दोन महिन्यात कोसळणार असल्याचे भाकित केले आहे.यावरून राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी राऊत यांना लक्ष्य केले.सध्या आमच्याकडे १७० आमदार आहेत.तर उद्धव ठाकरे गटातील किमान १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही यावेळी सामंत यांनी केला.राऊत यांनी शिंदे सरकार कोसळणार असल्याचा दाव्यावरही सामंत यांनी भाष्य केले.ठाकरे गटाचे आमदार सैरभैर होवू नये म्हणून त्यांचे हे राजकराण सुरू आहे असे सामंत म्हणाले.गुवाहटीच्या मंदिरात अनेक जण जातात त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्यात काय वेगळे आहे असा सवालही त्यांनी केला.आदित्य ठाकरे यांनी बिहारचा दौरा करून तेजस्वी यादव आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली.ही भेट महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणे कितपक योग्य आहे असेही ते म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे त्यांच्या राज्यात जाणार असल्याचे वक्तव्य करत आहेत त्यात कोणतेही तथ्य नसून, महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणा-या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे भूमीपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करुन या मराठी भाषा भवनाच्या उभारणीत उद्योग विभागाने तत्परता दाखवावी. तसेच उपकेंद्राच्या भूमीपूजनासाठी राज्यातील मान्यवर आणि मराठीतील जेष्ठ साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या एरोली येथील उपकेंद्रासाठी मराठी भाषा विभागाने आवश्यक निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द केला आहे, तर मराठी भाषाभवन साठी लागणाऱ्या निधीची तरतूद झालेली आहे तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले.

दरम्यान,आज उद्योगमंत्री सामंत यांनी ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच पुढील 15 दिवसांत काम सुरू करण्याची सूचना केली.मराठी भाषा भवन मुख्य केंद्र गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंडावर उभे राहणार आहे. तर, उपकेंद्र एरोली नवी मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे, या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Previous articleशिंदे -फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का ?
Next articleमुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार खासदार उद्या गुवाहटीच्या दौऱ्यावर ! मात्र गुलाबराव पाटील जाणार नाहीत