आरोग्य विभागातील ८ हजार ५०० जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांची मंजूरी

मुंबई नगरी टीम

मुंबई : नर्सेसच्या रिक्त असलेल्या जागा तातडीने भरल्या जाणार असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्यावतीने वेबिनार घेण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले.त्याबाबत या वेबिनारमध्ये सादरीकरण करण्यात आले.या वेबीनारच्या अध्यक्षतेस्थानी विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.त्यावेळी टोपे यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदभरतीला चालना मिळणार असून आगामी कालावधीत ही पदे भरली जातील.सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळवू,अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.शासकीय रुग्णालयाची सेवा,स्वच्छता,भोजन व्यवस्था यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात आरोग्य संस्थांची अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे पाच हजार कोटी निधीचा प्रस्ताव दिला आहे.तो ही लवकरच मंजूर होईल असेही टोपे यांनी सांगितले.

सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास वाढावा तसेच ही सेवा परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार असावी यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील जुन्या रुग्णवाहीका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहीका दाखल होतील. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यातील गरजू रुग्णांना यापुढे मोफत रक्त मिळावे यासाठी धोरण तयार करण्यात येत असून कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागणार नाही, यासाठी निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleकाही पक्षांना पॅालिटिकल अल्झायरम झालाय, सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा
Next article१० वर्षांपूर्वीचे बोलू नका आजचे बोला, शेतकरी आज रस्त्यावर आहे त्यावर बोला