मुंबई नगरी टीम
मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असे अजब विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते.त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून दानवेंना शाब्दिक चिमटा काढला आहे. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याची पंतप्रधान,संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी दखल घेतली पाहिजे.तसेच चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे,अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे.
शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या दानवेंवर त्यांनी आपल्या शैलीत टीका केली आहे. शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा गंभीर मुद्दा रावसाहेब दानवेंनी उपस्थित केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.त्यांनी असे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणार.यावर केंद्रीय मंत्रिमंडळातही चर्चा झाली असेल.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी दानवेंच्या विधानाची गांभीर्याने दखल घ्यावी.देशात अशांतता, अस्थिरता, अराजक माजवणाऱ्या चीन आणि पाकिस्तनावर तात्काळ सर्जिकल स्ट्राईक करावा, अशी शिवसेनेची मागणी आहे. दानवेंचे आम्ही आभार मानतो त्यांनी हा गंभीर मुद्दा देशासमोर मांडला. आता जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची आहे, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्राच्या भूमिकेवर देखील टीका केली. सरकारला खरेच तोडगा काढायचा असता तर तोडगा निघाला असता. पण बहुदा सरकारला हा विषय असाच लोंबकळत ठेवायचा आहे. महाराष्ट्र, पंजाबसह इतर सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सारख्याच आहेत. सरकारला कायदा आणि शेतीच्या कायद्यात काही बदल हवे असतील, तर भापशासीत राज्यांमधून सुरुवात करावी. तिथे प्रयोग करून पाहावा, काय परिणाम होतो ते पाहता येईल आणि त्यानंतर इतर राज्ये स्वीकारतील. कदाचित पंजाबही स्वीकारले, असे संजय राऊत म्हणाले.