मुंबई नगरी टीम
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरत या विषयाची तातडीने सभागृहात माहिती द्यावी व चर्चा करण्याची मागणी केली.अधिवेशनाचा कालावधी वाढवावा व राज्यातील महत्त्त्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची मागणीही दरेकर यांनी सभापतींकडे केली.
विधानपरिषदेच्या सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मराठा समाजाच्या विषयावर सभापतीकडे माहिती मागितली. दरेकर यांनी सांगितले की, मराठा समाजाची लोक त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. पुणे, नाशिक येथून अनेक तरुण – तरुणी आझाद मैदानाजवळ आंदोलन करत आहे . त्यामुळे त्यांचा प्रश्न समजावून घ्या व बाहेर ज्या घडामोडी सुरु आहेत त्याची माहितीही सभागृहाला देण्याची मागणी त्यांनी केली.
आज ओबीसी समाज गोंधळलेला आहे, मराठा समाजाचे आरक्षण कायम राहणार का ?मराठा समाज सुरक्षित आहे का ? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता व अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणीही करण्यात आली होती असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये अतिवृष्टीचा विषय गंभीर आहे. मराठा समाजाचा विषय, कृषीशी संबंधित अनेक विषय प्रलंबित आहेत, पण याविषयांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ नाही. त्यामुळे या सर्व विषयांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.