मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली लोकल सेवा कधी सर्वांसाठी सुरू होईल.याकडे समस्त मुंबईकर डोळे लावून बसले आहेत. अशातच नव्या वर्षात मुंबईकरांना ठाकरे सरकारकडून लोकल संदर्भात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात भाष्य केले असून नव्या वर्षात लोकल सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे नव्या वर्षात मुंबईकरांसाठी सरकारकडून हे एक मोठे गिफ्ट ठरणार आहे.
दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली.आता मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. लोकल ट्रेनबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. सर्वसामान्यांसाठी जानेवारीत लोकल ट्रेन सुरू करण्यास काही अडचण येणार नाही असे मला वाटते, असे वडेट्टीवार म्हणाले. यासह एकूण रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती देखील गेली आहे. त्यामुळे नवीन वर्षात लोकल ट्रेनला पुन्हा रुळावर आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान,लोकल सुरू केल्यानंतर प्रवाशांची होणारी गर्दी यावर कसे नियंत्रण ठेवणार, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, कोरोना सध्या नियंत्रणात आहे. दिल्लीत थंडी आणि गर्दीमुळे अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. मुंबईतही अशीच स्थिती उद्भवू नये म्हणून १५ दिवस नियोजन आणि चर्चा केली जाणार आहे. गर्दी कमी करण्याचे नियोजन, पोलीस व इतर मनुष्यबळाची मदत यासर्वांची चाचणी पूर्ण झाली असून नवीन वर्षात लोकल सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते.त्यामुळे सर्वांसाठी ती सुरू केल्यास मोठा दिलासा मिळेल. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच केवळ लोकल प्रवासाची मुभा आहे.