तुम्हालाच मागच्या दाराने आणीबाणी आणायचीय, संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : ठाकरे सरकारविरोधात बोलणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले जाते.महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.यावर उत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आणीबाणी, हुकूमशाही तुमच्याच मनात आहे. तुम्हालाच मागच्या दाराने या देशात आणीबाणी आणायची आहे, म्हणून तुम्ही तसे वातावरण तयार करत आहात, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले.पंजाब,हरियाणाचे जे शेतकरी आहेत त्यांच्या घरातला प्रत्येक तरुण हा आज भारतीय सैन्यात काम करत आहे. जे शेतकरी म्हणून बसले आहेत त्यातले असंख्य शेतकरी हे कालपर्यंत भारतीय सैन्यात काम करत होते. त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता. विरोधकांनी एखादा विषय उपस्थित केला तर आम्ही देशद्रोही आहोत. आमची पकिस्तानशी हातमिळवणी आहे. शेतकरी चीनकडून पैसे घेतात, असे म्हणत त्यांनी मोदी सरकार हे झिरो स्टँडर्ड आहे, अशी घणाघाती टीका केली.

मोदी सरकरकडे पूर्ण बहुमत असले तरी त्यांना लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकावेच लागेल. एखाद्या विरोधकाने आवाज उठवला तर तुम्ही आणीबाणीची आठवण करून देता. लोकशाहीत तुम्ही तुमच्या विरोधकांना देशद्रोही बोलता ही देखील एकप्रकारची आणीबाणी आहे. मोदी सरकार हे डबल स्टँडर्ड सोडाच पण झिरो स्टँडर्ड आहे, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यावरही प्रतिक्रिया देत राऊत म्हणाले की, या देशात कोणीही भ्रमात किंवा अंधारात नाही. कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या याच शेतकऱ्यांनी तुमचे खासदार देखील निवडून दिले आहेत. तुम्हाला निवडणून दिले तेव्हा हा भ्रम आहे, असे का नाही वाटले ? सरकारविरोधात आवाज आठवला तर ते भ्रमात असल्याचे बोलले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Previous articleमुंबईतील सर्वसामान्यांना मिळणार दिलासा ; या तारखेला सुरू होणार लोकल!
Next articleमोठी बातमी : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणार सरपंचपदाची सोडत