मुंबई नगरी टीम
मुंबई : ‘पहिले मंदिर फिर सरकार’ असे बोलणाऱ्यांची भाषा आता सरकार आल्यावर बदलली आहे, म्हणूनच संजय राऊत राम मंदिर राजकारणापासून दूर ठेवायले हवे अशी भाषा करीत आहेत. तसेच राममंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात येत आहे, खंडणी नव्हे असे ठणकावून सांगतानाच दरेकर म्हणाले की, आपणच लोक असल्याचा आव कोणी आणू नये, कारण आपण म्हणजे लोक नाही, मुंबईकर नाही व महाराष्ट्रही नाही, त्यामुळे तुम्ही आधी या भ्रमातून बाहेर या असा मार्मिक टोलाही दरेकर यांनी राऊत यांना लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना दरेकर म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळेच ते असे बोलत आहेत. वर्गणी आणि शिवसेना यांचा संबंध फार जुना आहे. शिवसेनेचे अनेक सामाजिक उपक्रम, कार्यक्रम या वर्गणीच्या माध्यमातून व्हायचे. मुंबई व राज्यातील शिवसेनेच्या अनेक शाखांचे निर्माणही याच वर्गणीतूनच झाले आहे. त्यामुळे वर्गणी हे काय प्रकरण असे म्हणणा-या राऊतांचे वक्तव्य म्हणजे “येड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाण्यासारखे आहे” असा टोलाही त्यांनी लगावला.राममंदिराच्या उभारणीसाठी १ कोटीची वर्गणी काहींनी जाहिर केली पण त्यांनी दिली का नाही ते माहित नाही असे सांगतानाच ते म्हणाले की, स्वयंसेवकांची नियुक्ती कोण करते असा सवालही राऊत यांनी केला आहे. पण माझा त्यांना सवाल आहे की, शिवसैनिकांची नियुक्ती कोण करते. त्यांची नियुक्ती कोण करित नसते, तर सामाजिक बांधिलकीतून काम करणारा व पक्षाची विचारधारा पुढे नेणारा तो शिवसैनिक असतो. स्वयंसेवकाचीही नियुक्ती होत नसते. तर स्वयंसेवक हा राष्ट्रभक्तीचा एक अविष्कार आहे. देशभक्तीसाठी उत्स्फुर्त काम करणारा स्वयंसेवक असतो. राष्ट्रवादी विचाराने प्रेरित झालेला असा हा कडवट कार्यकर्ता हा स्वयंसेवक आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
चार लाख स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रचार करणार असतील तर त्याचे दु:ख राऊत यांना होण्याचे कारण नाही असे सांगताना ते म्हणाले की, स्वयंसेवक जर घरोघरी जाऊन वर्गणीच्या माध्यमातून राममंदिर उभारणीसाठी काही योगदान देणार असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे. ज्यांनी राममंदिरासाठी रक्त सांडले त्यांचा यामुळे अपमान होईल हे राऊत यांचे विधान अतिशय हास्यास्पद आहे. उलट राम मंदिराच्या निर्माणमध्ये देशभक्ती करणाऱ्या रामभक्तांचा सहभाग होत असेल, तर राममंदीरासाठी रक्त सांडलेल्या रामभक्तांच्या आत्म्यास खरी शांती लाभेल. त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायचे कारण नाही. उलट त्यांच्या या हास्यास्पद वक्तव्यामुळे ज्यांनी मंदिरासाठी रक्त सांडले त्याचा यामुळे अपमान झाला आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. कुठल्या भांड्वलदाराने या राम मंदिर निर्माणासाठी पैसे दिले असते तर राऊत यांनी लगेच त्यावर टीका केली असती असे सांगून ते म्हणाले भांडवलदारांच्या पैशातून राम मंदिराची उभारणी आम्हाला मान्य नाही. प्रत्येक कार्यकर्ता, रामभक्त, देशप्रेमी नागरिकांचा यामध्ये सहभाग असणार आहे. लोकांच्या सहभागातून राम मंदिर उभे राहणार आहे. स्वयंसवेकाच्या प्रचाराला आता हिंदुत्वप्रेमींचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शिवसेनेचे नेते मंडळी अस्वस्थ झाली आहे. आपला जनाधार कमी होत असल्याची त्यांना चिंता आहे, त्यामुळेच त्या उद्वेगाच्या भावनेतून राऊत यांचे वक्तव्य आल्याची टिकाही दरेकर यांनी केली.