काँग्रेस कधी कोणाला ‘खो’ देईल हे कोणालाच माहित नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपद नुकतेच जाहीर करण्यात आले असून ही जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी मुंबई काँग्रेसचे निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचे अध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे. काँग्रेस पक्ष खो-खो सारखा असून त्यांना विरोधक लागत नाहीत, असा बोचरा वार निलेश राणेंनी केला आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.”काँग्रेस पक्ष हा खो-खो सारखा आहे. कधी कोणाला खो देतील आणि कधी कोणामुळे कोण बाद होईल हे कोणालाच माहीत नसते. काँग्रेसमध्ये एकदा कोणाला पद मिळालं, तर तो बाद कसा होईल याकरिता एक मोठा गट तयार असतो. काँग्रेस पक्षाला विरोधक लागत नाही”, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. यावेळी त्यांनी एका वृत्ताचा देखील संदर्भ दिला आहे. भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास दिली खरी, पण हे पद केवळ नावापुरताच असल्याची टीका विरोधक करत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष या दोन्ही स्वायत्त संस्था होत्या. त्यानुसार मुंबईतील महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटप असो वा कोणताही धोरणात्मक निर्णय असो मुंबई काँग्रेस घेत होती. मुंबई प्रदेशाध्यक्षांच्या अंतर्गत स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी समितीही यायची. मात्र काँग्रेसने प्रथमच मुंबई काँग्रेसच्या स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी कमिटीच्या चेअरमनपदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या अधिकारांवरच गदा असल्याचे बोलले जाते आहे.

Previous articleराममंदिरासाठी वर्गणी गोळा होतेय…खंडणी नव्हे…! राऊतांना दरेकरांचा टोला
Next articleकृषी कायद्याला विरोध करणे, हे घटनेला धक्का देण्यासारखे