कृषी कायद्याला विरोध करणे, हे घटनेला धक्का देण्यासारखे

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या देशभरात आंदोलन पेटले आहे. त्याचे पडसाद आज मुंबईत देखील पाहायला मिळाले.दिल्लीत गेल्या चार आठवड्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी हिताचे नसलेले हे कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र कृषी कायद्याला विरोध करणे म्हणेज लोकशाहीमध्ये घटनेला धक्का देण्यासारखे आहे,असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी मुंबईत एका कार्यक्रमावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी कृषी कायद्यावरून भूमिका स्पष्ट केली.”कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आहे. कृषी कायदा रद्द करण्याची मागणी ही लोकशाहीमध्ये घटनेला धक्का देणारी आहे. या कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. आंदोलन करण्याचाही त्यांना लोकशाहीत अधिकार आहे. परंतु आडमुठी भूमिका घेऊन केवळ कायदा रद्द करा, अशी मागणी जर केली आणि सरकारने ती मान्य केली. तर सगळे कायदे रद्द करावे लागतील. कारण प्रत्येक कायद्याला विरोध हा होतच असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मला वाटते. शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण कृषी कायदा मागे घेण्याची मागणी सोडून त्यात बदल करणे सुधारणा करणे, अशी मागणी त्यांनी करणे आवश्यक आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, केंद्राच्या या कृषी कायद्याविरोधात आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना तसेच राज्यातील शेतकरी सामील झाले होते. राजू शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील यात सहभागी झालेले पाहायला मिळाले. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीमधील अंबानी, अदानीच्या कार्यालयावर आंदोलक धडक मोर्चा काढणार होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. कलानगर परिसरात एकप्रकारे छावणीचे रूप पाहायला मिळाले.

Previous articleकाँग्रेस कधी कोणाला ‘खो’ देईल हे कोणालाच माहित नाही
Next articleभविष्यात राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ‘सेना भवनच’ असणार