मुंबई नगरी टीम
मुंबई : माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांचा लग्नसोहळा हा बराच चर्चेत आहे. लग्नात जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे सर्वच स्तरातुन यावर टीका करण्यात आली. परंतु ही बाब आता इतक्यावरच न थांबता या सोहळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते मंडळीही उपस्थित होते.
आमदार राम सातपुते यांच्या लग्नसोहळ्यातील गर्दी पाहता कोरोनाचे नियम धाब्यावर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राम सातपुते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात अगदी थाटामाटात राम सातपुते यांचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी भाजपचे दिग्ग्ज नेते मंडळी देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यासंह अन्य नेत्यांची उपस्थिती होती.
सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरताच फज्जा उडालेला दिसला. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. त्यामुळे नेते मंडळींसाठी कोरोनाचे नियम लागू होत नाही का?, असा सवाल विचारला जात होता. लग्न सोहळ्यात ५० लोकांची मर्यादा असतानाही आमदाराच्या लग्नात इतकी गर्दी कशी जमते अशी टीका करत नेटकऱ्यांनी भाजप नेत्यांना धारेवर धरले. मात्र याचा राजकीय विषय करू नये, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले. कार्यक्रमात जे काही झाले त्याचे कसलेही समर्थन नाही. काळजी ही घायलाच हवी आणि आपण ती घेत आहोत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी आता सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. मंदिरे उघडली असून सगळे व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे नियम पाळायला हवेत, पण केवळ भाजप आमदाराचे लग्न आहे, मी आणि देवेंद्र फडणवीस तिथे होतो याचा राजकीय मुद्दा करायला नको, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.