मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील बडे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांमागे सध्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून ईडीचा ससेमिरा लागलेला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस धाडण्यात आली आहे.तर या पाठोपाठ आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजप नेते सोडून इतर सर्वांना ईडीची नोटीस येणे काही नवे नाही. राजकीय स्वार्थासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जात आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील ईडीची नोटीस बजावण्यात आली होती.या एकंदर ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीने भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर राजकीय वर्तुळाता गरमागरम चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. महाराष्ट्रासाठी ईडीचा खेळ काही नवा नाही. भाजपविरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जाते,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भाजपला फटकारले. तुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरत आहे ? याआधी ईडीने शरद पवार यांना नोटीस बजावली होती. ती मागे का घेतली,असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्रात अशाप्रकारचे राजकारण कधीही पाहिले नाही
ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपविरोधात किंवा त्यांच्या धोरणाविरोधात जो बोलेल त्याच्यामागे ईडी, सीबीआयची चौकशी लावली जाते. सीबीआयबाबत आता आमचा स्वातंत्र अधिकार आहे. आमच्या परवानगीशिवाय ते महाराष्ट्रात सीबीआयची चौकशी करू शकत नाही. पंरतु ईडीचा सुद्धा अशा पद्धतीने दुरुपयोग करणे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीचे राजकारण कधीही पाहिले नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
ईडीची नोटीस येणे स्वस्त झाले आहे
भारतात अनेकांना ईडीची नोटीस येते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणे स्वस्त झाले आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला लगावला आहे. आजकाल कुणालाही नोटीस बजावली जाते. मग त्यात त्या व्यक्तीचा संबंध असो व नसो. त्यामुळे लोकांनाही आता काही वाईट वाटत नाही. ईडीच्या नोटीसला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कुणी काही चुकीचे केले असेल तर तथ्य समोर येईल. पण केवळ नोटीस येणे फार काही महत्त्वाचे नाही, असेही ते म्हणाले.