मुंबई नगरी टीम
मुंबई : ज्यांच्याकडे लपवण्यासारखे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करतात.महाराष्ट्रात आणि आंध्रप्रदेशात तशी उदाहरणे आहेत.आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही.आम्ही शिवसेनेत आहोत,शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेत मरणार,अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.मंगळवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून आज मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते.मात्र वर्षा राऊत या आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत.आम्ही ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
वर्षा राऊत यांना आलेल्या नोटिशीनंतर ईडीशी कोणती चर्चा झाली का ? वेळ वाढवून मागितली आहे का ?, असे प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देत ते म्हणाले,कितीही मतभेद असले तरी ईडी या देशाची संस्था आहे.सरकारच्या तपास यंत्रणेकडून एखादा कागद कुटुंबाला आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कायद्याला आम्ही मानतो. या देशात कायदा सर्वात मोठा आहे. त्यावर कुणीही किती दबाव आणला तरी आम्ही कायद्याला मानतो त्याचा आदर करतो. जी गोष्ट आम्हाला लोकांसमोर ठेवायची होती ती काल पत्रकार परिषदेत सांगितली आहे. आणखी काही गोष्टी आहेत, त्यादेखील सांगेन. आम्ही जे काही सांगितले ते ईडी आणि देशासाठी मार्गदर्शक असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
मी अद्याप नोटीस पाहिलेली नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळे राजकरण कसे चालते मला माहित आहे. त्याचे उत्तर आम्ही देऊ. हो आम्ही वेळ मागितली आहे. इतके मोठे प्रकरण आहे. संपूर्ण देश हादरला आहे. सध्या आपल्या देशात काहीच सुरू नाही. सध्या हे एकच प्रकरण त्यांच्याकडे आहे. माझ्याकडे असलेली १२० जणांची यादी दिल्यानंतर कदाचित ईडीकडे खूप काम येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. कधी काळी ईडी या संस्थेला फार प्रतिष्ठा होती. मात्र आता त्यांना ती मिळत नाही. मला सध्या ईडीची कीव येते. त्यांना सरकारी गुलाम मानले जाते हे दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले. तसेच भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता भाजप नेतेही आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.