मुंबई नगरी टीम
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात रंगलेले शाब्दिक युद्ध सर्वांनीच पाहिले. या सर्व घडामोडींनंतर कंगना राणावत पुन्हा मुंबईत परतली आहे.मुंबईत परतल्यानंतर तिने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, यावेळी तिने मुंबईत राहण्यावरून पुन्हा एकदा भाष्य केले आहे. त्यामुळे कंगनाने महाविकास आघाडी आणि संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावल्याचे दिसत आहे.
कंगना राणावत हिने तिची बहीण रांगोली, भाऊ आणि वहिनीसोबत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.मंदिराबाहेर येताच तिने ‘जय महाराष्ट्र’ असा जयघोष केला.यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. “मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. केवळ गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळालेली आहे. आणखी कोणाकडे मी परवानगी मागितलेली नाही”, असे ती म्हणाली. यावेळी कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर सिद्धिविनायक मंदिरातील फोटो पोस्ट करत ट्वीट देखील केले आहे. “माझ्या प्रिय मुंबई शहरासाठी उभे राहिल्यानंतर मला जितके शत्रुत्व सहन करावे लागले ते पाहून मी हैराण झाले. आज मी मुंबाबादेवी आणि श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित, प्रेम आणि स्वागत केल्यासारखे वाटत आहे”, असे कंगना म्हणाली.
दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगनावर चौफेर टीकेचा भडीमार करण्यात आला होता. कंगनाला मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर ती इथून जाऊ शकते, अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिल्या होत्या. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांची टिप्पणी कंगनाला चांगलीच लागली. त्यानंतर ठाकरे सरकार विरुद्ध कंगना असा एकच सामना पाहायला मिळाला होता.त्यात कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या महानगरपालिकेच्या कारवाईनंतर हा वाद आणखी चिघळला. या सगळ्या वादविवादानंतर कंगना हिमाचलमधून आता मुंबईत परतली आहे. यावेळी तिच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था होती.