मुंबई नगरी टीम
मुंबई : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२१ रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी कोविड आणि त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गर्दी करून नये, शक्यतो यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया,असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सकाळी ६ ते ७ या वेळात अभिवादन करणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, तसेच या भागातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत. शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या प्रेरणस्थळाच्या ठिकाणी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या आदर्श अभिवादन समारंभाला लाखो अनुयायी येत असतात, मात्र यावर्षी कोरोना मुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत या ठिकाणी गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून एक आदर्श निर्माण करावा असे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.