मुंबई नगरी टीम
नागपूर : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून भाजप आता शिवसेनेला घेरण्याच्या तयारीत दिसत आहे. शिवसेनेला केवळ निवडणुका जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.निवडणुका जवळ आल्यानेच शिवसेनेकडून नामांतराचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निवडणूक झाल्यावर त्यांना याचा विसर पडेल,असे फडणवीस म्हणाले. यासह नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी टोला हाणला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला.यावेळी औरंगाबाद नामांतराविषयी विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, शेवटी शिसवेना केवळ निवडणुकीपुरता हा मुद्दा वापरत आहे. निवडणूक झाल्यानंतर ते विसरून जातात. आताही महानगरपालिकेची निवडणूक आल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची ही नुरा कुस्ती आहे. मी करतो म्हणायचे तू नाही करतो म्हणायचे. अशाप्रकारे दोघे मिळून नुरा कुस्ती करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतरला काँग्रेसचा विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असे थोरात यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या. २०२१ हे वर्ष महाराष्ट्र आणि देशाकरता अतिशय आव्हानात्मक होते. २०२१ महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुखा समाधानाचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना विशेषकरून शेतकऱ्यांना, मजुरांना, गरिबांना या काळात त्रास भोगावा लागला. आता २०२१ साल त्यांच्याकरताही चांगले जावो. यंदाच्या वर्षात राज्य सरकारने शेतकरी, मजुरांना मदत करावी, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.